भारतात प्रथमच महिला काझीने लावला निकाह


महिला काझी हकीमा खातून या भारतातील निकाह पढविणाऱ्या पहिल्या महिला काझी बनल्या आहेत. मुस्लीम विवाह पद्धतीत पुरुष काझी निकाह चा खुताबा पढू शकतात. मुंबई मध्ये शेमोन अहमद आणि माया राचेल यांचा निकाह प्रथमच महिला काझीने लावल्याची घटना घडली आहे. भारतात १६ महिला काझी आहेत मात्र त्यातील हकीमा या निकाह लावणाऱ्या एकमेव काझी ठरल्या आहेत.

पिढ्यानपिढ्या मुस्लीम समाजात पुरुष काझी निकाह लावत आले आहेत. त्याविरोधात अमेरिकेतील इमाम व काझी डॉ. अमिना वदुद यांनी आव्हान दिले होते व आंदोलन पुकारले होते ते लोण भारतात आले आहे. काझी हकीमा म्हणाल्या, कुराणात महिलांनी निकाहचा खातुबा पढू नये असे कुठेही म्हटलेले नाही. हे काही शब्द आहेत. पुरुष काझी ते वाचू शकतात तर महिला काझी का वाचू शकणार नाहीत? विशेष म्हणजे शेमोन यांनी जिच्याशी निकाह केला ती माया ब्रिटीश आहे. तिने महिला काझी संदर्भात वाचले होते आणि आपला निकाह महिला काझींनी लावावा असा आग्रह धरला होता.

महिला काझींच्या म्हणण्यानुसार भारतात ही रूढी अद्याप रुळलेली नाही कारण महिला काझींनी निकाह लावला तर तो अवैध ठरेल का अशी अनेकांना भीती वाटते. त्यामुळे महिला काझीना निकाहसाठी बोलावले जात नाही. पण ही परिस्थिती हळूहळू बदलेल याची खात्री आहे.

Leave a Comment