मॉरीस कोंबड्याने जिंकला दावा, हवी तेव्हा देणार बांग


प्रत्येक देशाच्या न्यायालयात कित्येक दावे सुरु असतात. त्यात कुणाचा विजय कुणाची हार हेही सुरु असते. पण फ्रांसमधील एक खटला गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेचा विषय ठरला होता, त्याचा निकाल नुकताच लागला असून आरोपी कोंबडा मॉरीस याने हा दावा जिंकला आहे. त्यामुळे आता मॉरीस त्याच्या मर्जीला येईल तेव्हा कधीही बांग देऊ शकणार आहे.


या खटल्याची हकीकत अशी कि फ्रांसच्या रोषफोर्ट न्यायालयात एका जोडप्याने शेजारणीचा कोंबडा जोरजोरात ओरडतो आणि त्यामुळे त्यांच्या शांततेला बाधा येते म्हणून न्यायालयात दावा दाखल केला. कोंबड्याचे नाव मॉरीस आणि त्याची मालकीण कोरीन फेस. या दोघांविरुद्ध हा दावा दाखल झाला आणि जगभरात या खटल्याची चर्चा सुरु झाली. फेसचे अन्य शेजारी तिच्याबाजुने उभे राहिले तर देशभरातून हजारो लोकांनी एकत्र येऊन फेसला पाठींबा दिला. दावा करणरे जोडपे सुटीसाठी त्यांच्या या गावातील घरी आले होते तेव्हा मॉरीस देत असलेल्या बांगेचा त्रास त्यांना होत होता.

खटल्याचा निकाल देताना जज म्हणाले, बांग देण्यापासून मॉरीसला रोखता येणार नाही कारण ती त्याची प्रकृती आहे. शिवाय हा ग्रामीण भाग आहे. न्यायालाचा निर्णय येण्याअगोदरच मॉरीसच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून या गावाच्या महापौरांनी कोंबड्याचा बांग देण्याचा अधिकार सुरक्षित आहे असा अध्यादेश जारी केला होता. न्यायालयाच्या निर्णयाने त्याला अधिक बळ मिळाले असून न्यायालयाने फिर्यादीला मॉरीसची मालकीण फेस हिला ११०० डॉलर्स नुकसानभरपाई द्यावी असाही आदेश दिला आहे.

Leave a Comment