बेल्स शिवाय खेळला गेला हा क्रिकेट सामना


ऑस्टेलिया आणि इंग्लंड यांच्या खेळल्या गेलेल्या अॅशेस सिरीज मधील चौथा कसोटी सामना काही वेळ बेल्स शिवाय खेळला गेला. झाले असे कि हा सामना सुरु असताना ४४ ओव्हर झाल्यावर अचानक वातावरण बदलले आणि जोरदार वारे वाहू लागले. त्यामुळे स्टंपवर ठेवलेल्या बेल्स वारंवार पडू लागल्या. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड याने वारंवार बेल्स पडत असल्याची तक्रार केल्यावर दोन्ही अम्पायरनी सहमतीने आपत्कालीन परिस्थितीसाठी केल्या गेलेल्या क्रिकेट नियमाचा वापर करून बेल्स न ठेवताच सामना सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेटमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काही नियम केले गेले आहेत. नियम ८.५ नुसार बेल्समुले सामन्यात व्यत्यय येत असेल तर त्या काढून सामना पुढे सुरु ठेवण्याची तरतूद आहे. हवामान सुधारले कि पुन्हा बेल्स स्टंपवर ठेवल्या जाव्यात असे त्यात म्हटले गेले आहे.

या सामन्यात वारे जोरात वाहत असताना बेल्स काढून ठेवल्या गेल्या आणि वाऱ्याचा जोर कमी झाल्यावर थोड्या जड वजनाच्या बेल्स स्टंपवर ठेवल्या गेल्या. २०१७ मध्ये अफगाणिस्थान विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात या प्रकारे बेल्स काढून ठेवल्या गेल्या होत्या. या परिस्थितीत रन औट देताना बेल्स नसल्याने विकेट जवळच्या फिल्डरला हाताने स्टंप उखडाव्या लागतात आणि डायरेक्ट हिट मध्ये बॉल स्टंपवर लागणे अपेक्षित असते. तरच फलंदाजाला औट दिले जाते.

Leave a Comment