चढउतार जीवनाचे अविभाज्य अंग,धीर सोडू नका- मोदी


चांद्रयान दोन चंद्रावर चढाईच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आणि केवळ देशातीलच नवे तर जगभरातील उत्सुकांच्या नजरा चंद्रभूमीवर उतरण्याच्या तयारीत असलेल्या विक्रम लँडरचा वेध घेत असताना इस्रोचा लँडर बरोबरच संपर्क तुटला. क्षणात या मोहिमेसाठी अहोरात्र झटलेल्या वैज्ञानिकांच्या हृदयाचे ठोके काही क्षणासाठी विस्कळीत झाले. मात्र या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले पंतप्रधान मोदी यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करून त्यांना चढउतार हा जीवनाचे अविभाज्य अंग आहे तेव्हा धीर सोडू नका, तुम्ही आज मिळविलेले यश मोलाचेच आहे. तुमच्या योगदानाचा साऱ्या देशाला अभिमान आहे. आपला हौसला बुलंद आहे. सारा देश तुमच्यासोबत आहे. चंद्रावर जाण्याचे आपले स्वप्न अधिक दृढ झाले आहे असे देशाला केलेल्या संबोधनात सांगितले.

७ सप्टेंबरच्या मध्यरात्री दीड पासून सर्व देशवासीयांचे डोळे चांद्रयान २ चा प्रवास पाहण्यासाठी टक्क जागे होते. लँडर विक्रम चंद्रापासून २०० किमी पोहोचले आणि त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला. इस्रोच्या कंट्रोल रूम मधील वातावरण एकदम गंभीर बनले. यश अगदी दृष्टीपथात आले असताना बसलेला हा धक्का मोठा होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वैज्ञानिकांचे कौतुक करून त्याचा हौसला बुलंद ठेवला. ते म्हणाले, यश समोर दिसत असताना अचानक सारे थांबले हा क्षण मी तुमच्यासोबत अनुभवतो आहे. मात्र आपला हौसला तुटलेला नाही तो आणखी बुलंद झाला आहे. हा प्रवास असाच सुरु राहणार आहे. इस्रो कधीही हर न मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. प्रत्येक प्रयोगातून, प्रत्येक प्रयत्नांतून ज्ञानाचे नवे बीज पेरले जाते तेव्हा धीर सोडू नका.


मोदी यांनी इस्त्रो कंट्रोल रूम मध्ये जाऊन सर्व वैज्ञानिकांशी हस्तांदोलन केले आणि त्यांचे अभिनंदन केले, इस्रोचे प्रमुख बी. सिवन यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला तेव्हा मोदी यांनी त्यांना मिठी मारली आणि सिवन यांना अश्रू रोखणे अवघड बनले. या दृशाने सारेच भारावून गेले होते.

Leave a Comment