विमानतळावर तुमचा चेहराच बनणार आता बोर्डिंग पास


दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारपासून येथील टर्मिनल 3 वर बायोमॅट्रिक इनेबल्ड सिमलेस ट्रॅव्हल (बीइएसटी) प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे फेस रिकग्निशन टेक्नोलॉजीच्या मदतीने प्रवाशांना प्रवेश मिळेल. यामुळे प्रवाशांना विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि विमान बोर्डिंग सारख्या सर्वच जागांवर ओळखपत्र दाखवण्याची गरज राहणार नाही. तीन महिन्यांच्या ट्रायलसाठी विस्तारा एअरलाइनसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर देशातील अन्य विमानतळांवर देखील हे तंत्रज्ञान सुरू करण्यात येईल. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, यामुळे चेक इन ते तपासणीपर्यंत लागणारा वेळ वाचेल. या प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी प्रवाशांची परवानगी घेण्यात येईल. याआधी या प्रणालीचे ट्रायल वापर हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू झाला आहे.

विमानतळावर एंट्री गेटच्या आधी एक हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे. विस्तारामधून जाण्याआधी प्रवाशी तेथे तिकिट आणि ओळखपत्र घेऊन जातील.  तपासणीनंतर प्रवाशांचे कॅमेऱ्याद्वारे फेस रिकग्निशनकरून युनिक आयडी बनवण्यात येईल. त्यानंतर ही नोंदणी कॉम्प्यूटरमध्ये सेव्ह करण्यात येईल. हा युनिक आयडी एंट्री गेट, चेक इन गेट आणि बोर्डिंग गेटवर सर्वरच्या मदतीने चालेल. त्यानंतर प्रवाशांना विमानतळावर कोठेच आयडी दाखवण्याची गरज नाही. रजिस्ट्रेशनसाठी तिकिट आणि मान्य असलेले ओळखपत्र घेऊन जाणे गरजेचे आहे.

Leave a Comment