पोलिसांनी चलान दिले म्हणून जाळून टाकली स्वत:चीच मोटारसायकल


नवी दिल्ली – १ सप्टेंबरपासून वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनचालकांना अधिकचा दंड भरावा लागत आहे. सध्या याच नियमांची आणि त्यानुसार सुरु झालेल्या दंडाची देशभरात चर्चा आहे. त्यातच एक धक्कादायक घटना आता दिल्लीमध्ये समोर आली आहे. नव्या नियमांनुसार दिल्लीतील एका व्यक्तीला पोलिसांनी दंड केल्यामुळे संतापलेल्या मोटारसायकल स्वाराने स्वत:चीच मोटारसायकलच पेटवून दिली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार दिल्लीतील शेख सराई परिसरात घडला.


याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, स्वत:चीच मोटारसायकल पेटवून देणार हा इसम दारुच्या नशेत होता. या इसमाला पोलिसांनी दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी थांबवले. त्याला पोलिसांनी गाडीचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले. त्यावेळी गाडीची कागदपत्रे दाखवतो असे पोलिसांना सांगत गाडीवरुन हा इसम खाली उतरला आणि त्याने गाडीच पेटवून दिली.

पोलीस हवालदारही घडलेला प्रकार पाहून गोंधळले. लगेच त्यांनी अग्निशामन दलाला फोन आगीची माहिती दिली. अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवली. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण या व्यक्तीचे नाव काय होते याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

Leave a Comment