उद्या चंद्रावर फडकणार तिरंगा


नवी दिल्ली -केंद्रावरून जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले असून शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. शास्त्रज्ञांसाठी हा काळ आव्हान ठरणार आहे.

यानाचे नियंत्रण श्रीहरीकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे सुरू आहे. चांद्रयान-२ चे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा १५ मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत.

या यानाने पूर्वनियोजित मार्गावरून तीन लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा कि.मी. किंवा प्रतितास २१ हजार ६०० कि.मी. असा आहे. त्यानंतर विक्रमचा वेग १५ मिनिटांनी दोन मीटर प्रतिसेकंद राहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे. चांद्रयान-२चा आतापर्यंतचा प्रवास सुरळीत होता. इस्राएलने पाच महिन्यांपूर्वी चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला होता, कारण त्यांच्या यानाचा वेग पुरेसा मंदावला नसल्याने ते कोसळले होते.

Leave a Comment