या राज्यात लागू झाले नाहीत नवे वाहन नियम


नवीन वाहन नियम सर्व देशभर लागू करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यावर त्याची अंमलबजावणी बहुतेक सर्व राज्यात सुरु झाली असली तरी मध्यप्रदेश आणि पंजाब या राज्यात अजून हे नवे नियम लागू केले गेलेले नाहीत असे समजते. नवीन वाहतूक नियम उल्लंघन केल्याप्रकरणात वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून २३ हजारापासून ५९ हजारापर्यंत दंड वसूल करत असल्याचा बातम्या झळकू लागल्या असल्या तरी सध्या मध्यप्रदेश आणि पंजाब मधील वाहन चालक त्यापासून बचावले आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार नवीन वाहन नियमांचे सरकार अध्ययन करत आहे. अन्य राज्यावर या नियमांचा काय प्रभाव पडला आहे त्याचा अभ्यासही केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले आमच्या राज्यात जनहिताला अधिक प्राधान्य आहे. त्यामुळे पूर्ण अध्ययन केल्यावरच नवे नियम लागू करण्याबाबत विचार केला जाईल.

पंजाब सरकारनेही नवे वाहन नियम अजून लागू केलेले नाहीत. पंजाबच्या परिवहन मंत्री रजिया सुलतान म्हणाल्या, या नियमानुसार दंड ठोठावणे म्हणजे सर्वसामान्य लोकांवर बोजा टाकणे आहे. तरीही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याबरोबर विचारविनियम करून त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment