असे असेल अंतराळातले हॉटेल


अंतराळात खरोखरच हॉटेल होणार का हा सध्या अनेकांना कुतूहलाचा विषय आहे. त्यांच्यासाठी एक न्यूज आहे. ती म्हणजे अंतराळात बांधले जाणारे हॉटेल कसे असेल याचे फोटो समोर आले असून हे अद्भुत हॉटेल गेट वे फौंडेशनने डिझाईन केले आहे. या हॉटेलमध्ये ४०० लोक राहू शकणार आहेत. पृथ्वीवरील हॉटेल्सप्रमाणे येथेही रेस्टॉरंट, बार, चित्रपट थियेटरसह अनेक सुविधा असतील. पहिल्या अंतराळ हॉटेलचे नाव वॉन ब्राऊन स्पेस स्टेशन असेल असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जे तंत्रज्ञान वापरले गेले आहे तसेच तंत्रज्ञान या हॉटेल साठी वापरले जाईल. शिवाय या हॉटेलसाठी कृत्रिम गुरुत्वाकर्षण फोर्स निर्माण केला जाणार आहे. यामुळे हॉटेलमधील प्रवासी एका जागेहून दुसरीकडे सहज जाऊ येऊ शकतील.


या हॉटेलचा आकार १९० मीटर व्यासाचे एखादे प्रचंड मोठे चक्र असावे तसा दिसेल. हे हॉटेल गोलाकार फिरेल आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षण फोर्स निर्माण होईल. हे हॉटेल २०२५ पर्यत तयार होईल असेही सांगितले जात आहे. सुरवातीला या हॉटेलमध्ये दर आठवड्याला १०० प्रवासी राहू शकतील. एकदा हे हॉटेल व्यवस्थित सुरु झाले कि गेटवे फाउंडेशन आणखी मोठे हॉटेल बांधण्याच्या विचारात असून त्याची क्षमता १४०० प्रवासी इतकी असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment