रिक्षाचालकाला ४७५०० रुपयांचा दंड !


भुवनेश्वर – मोटार वाहन कायद्यातील सुधारणांनंतर तब्बल २३ हजार रुपयांचा दंड गुरुग्राममधील एका दुचाकी चालकाला भरावा लागल्याची घटना ताजी असतानाच आता मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल भुवनेश्वर येथील एका रिक्षाचालकाला प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ४७,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या रिक्षाचालकाचे हरिबंधू कन्हार असे नाव आहे.

वाहन चालविण्याच्या परवान्याशिवाय हरिबंधू कन्हार हे रिक्षा चालवत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे वाहन नोंदणी प्रमाणपत्र नव्हते, रिक्षा चालविण्याचे परमिट नव्हते, संबंधित वाहनाचे पीयूसी आणि विमा उतरविलेला नव्हता, या सगळ्या गोष्टींमुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ४७५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कनिष्ठ प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप पैक्रे या संदर्भात म्हणाले, रिक्षाचे परमिट हरिबंधू कन्हार यांच्याकडे नव्हते, त्याचबरोबर मद्यपान करून ते गाडी चालवित होते, त्यांच्या गाडीमुळे प्रदूषण होत होते, या सगळ्याबद्दल त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, वाहन नोंदणीची मुदत उलटून गेली होती, त्याचबरोबर अनधिकृत व्यक्ती रिक्षा चालवत होती, त्यांना या सगळ्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विम्याशिवाय गाडी चालवत असल्याबद्दल २००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंडांची रक्कम भरू शकत नसल्याचे सांगितल्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित रिक्षा जप्त केली आहे.

Leave a Comment