लिव इन रिलेशनशीपमध्ये महिलेला मिळते ‘त्या’ महिलेसारखी वागणूक


जयपूर – राजस्थानमधील मानवाधिकार आयोगाने महिलांनी लिव इन रिलेशनशीपपासून दूर राहावे आणि यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जनजागृती करावी, अशी सूचना केली आहे. मानवाधिकाराच्या विरोधात लिव इन रिलेशनशीप ही संकल्पना असून महिलेला यामध्ये गुलाम किंवा रखेल म्हणून वागणूक दिली जाते, याकडे आयोगाने लक्ष वेधले. तसेच समाजात या बद्दल जनजागृती करून शहरांमध्ये वाढत असलेले लिव इन रिलेशनशीपचे प्रकार रोखण्यासाठी कायदा करण्याची सूचनाही आयोगाने केली आहे.

तेथील मुख्य सचिव आणि गृह विभागाचे अतिरिक्त सचिव यांना राजस्थान मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. प्रकाश टाटिया आणि न्या. महेशचंद्र शर्मा यांनी पत्र लिहिले असून, या संदर्भात कायदा करण्याची सूचना त्यांना केली आहे. या संदर्भात केंद्र सरकारनेही कायदा करावा, असे आयोगाने म्हटले आहे.

आयोगापुढे सुनावणीसाठी लिव इन रिलेशनशीप संदर्भातील काही प्रकरणे आली होती. त्यानंतर लिव इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजले पाहिजेत, यासाठी आपले मत देण्याचे आवाहनही काही दिवसांपूर्वी आयोगाने केले होते. आयोगाकडे आलेली मते आणि सूचना बघितल्यावर आयोगाने सन्मानाने जगण्याचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकांला असला पाहिजे, असे म्हटले आहे. गुलाम किंवा रखेल म्हणून कोणत्याही महिलेला कोणीही वागवू शकत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

Leave a Comment