पिसाळलेल्या हत्तीविरुद्ध एफआयआर दाखल


हत्ती हा प्राणी एरवी शांत मानला जातो. अतिशय बुद्धिमान असा हा प्राणी कधीतरी पिसाळतो आणि मग त्याच्यावर नियंत्रण करणे फार अवघड बनते. बिहारच्या मोतीहारी भागात चिडलेल्या अश्याच एका हत्तीवर पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार हा हत्ती रस्त्यावरून जात असताना काही कारणाने चिडला आणि त्याने समोर येईल त्याचा चक्काचूर करायला सुरवात केली. हत्तीचे हे उग्र रूप पाहून घाबरलेला माहूत रस्त्यावरून पळत सुटला आणि त्याचवेळी वेगाने आलेल्या एका बोलेरो गाडीला धडकून ठार झाला. त्याचवेळी बोलेरोतील सात लोक जखमी झाले. हत्तीच्या आक्रमणामुळे गावातील लोकांच्या घरांचे आणि अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झालेच पण हत्तीच्या दहशतीने लोक दारे लावून घरात बसून राहिले.

हत्तीवर काबू मिळविण्याचे प्रयत्न सुरु असतानाच दुसऱ्या एका माहुताला पाचारण करण्यात आले आणि त्याने महत्प्रयासाने हत्तीवर नियंत्रण मिळविले. हा हत्ती सरीयापूर गावात राहणाऱ्या अनिल ठाकूर याच्या मालकीचा असल्याचे कळले. पोलिसांनी हत्तीवर केस दाखल केली आणि नंतर त्याला मालकाच्या ताब्यात दिले असे समजते.

Leave a Comment