हिंदुंची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेची नेटफ्लिक्स विरोधात तक्रार


मुंबई : ऑनलाईन फ्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्‍स विरोधात भारत देश आणि हिंदुंची बदनामी करण्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सविरोधात शिवसेनेचे आयटी सेलचे सदस्य रमेश सोलंकी यांनी तक्रार दाखल केली आहे. नेटफ्लिक्सविरोधात मुंबईतील एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली गेली आहे. ‘सेक्रेड गेम्स’, ‘लैला’ आणि ‘घोल’ वेब सीरिजसह स्टँडअप कॉमेडियन हसन मिन्हाजच्या कार्यक्रमाचा उल्लेख तक्रारीमध्ये करत सोलंकी यांनी नेटफ्लिक्‍सवर जगभरात हिंदुंचा अपप्रचार होत असल्याचा आरोप केला आहे.

आपल्या तक्रारीत सोलंकी यांनी म्हटले आहे की, नेटफ्लिक्स इंडियावर प्रसिद्ध होणाऱ्या जवळपास सर्व वेब सीरिजद्वारे जागतिक स्तरावर देशाच्या बदनामीचा हेतू दिसून येत आहे. हिंदुंबाबत मनात असलेल्या भीतीपोटी नेटफ्लिक्सवर देशाची छबी वाईट पद्धतीने दाखवली जात आहे. सोबतच हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सोलंकी यांनी नेटफ्लिक्सविरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांनी मी विनंती करतो की तक्रारीत नमूद केलेल्या सर्व वेबसीरिज पाहाव्यात आणि नेटफ्लिक्सच्या टीमला समन्स पाठवून लायसन्स रद्द करेपर्यंत, जे काही कठोरातील पाऊल उचलावे लागेल ते उचलावेत, अशीही आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. नेटफ्लिक्‍स ही एक अमेरिकन कंपनी आहे. नेटफ्लिक्स गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील मनोरंजन क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. नेटफ्लिक्‍स चाहत्यांमध्ये काही वेबसीरिजमुळेच प्रसिद्ध झाले आहे. पण यावरील काही सीरिज वादग्रस्तदेखील ठरल्या आहेत.

Leave a Comment