आधार कार्ड काढण्यासाठी लांबच लांब रांगेत थांबण्याची वेळ तुमच्यावरही कधीना कधी आली असेलच. मात्र आता आधारकार्डसाठी रांगेत थांबण्यापासून सुटका होणार आहे. आधार सेवा केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता लोकांना आधीच ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. युआयडीएआयने यासंबंधी सुचना जारी केली आहे. देशातील अनेक शहरात आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याठिकाणी आधार संबंधित सेवा देण्यात येत आहेत.
सेवा केंद्रावर आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी घ्यावी लागणार ऑनलाइन अपॉइंटमेंट
युआयडीएआयने दिल्ली, चेन्नई, भोपाळ, आग्रा, हिसार, विजयवाडा आणि चंदीगडमध्ये आधारकेंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांबरोबरच लवकरच पाटणा आणि गुवाहाटीमध्ये देखील केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सीईओ अजय भूषण यांनी सांगितले की, युआयडीएआय लवकरच देशातील 53 शहरात 114 सेवा केंद्र सुरू करणार आहे. हे सर्व केंद्र या वर्षाअखेर सुरू होणार आहेत.
या सेवा मिळणार –
- नवीन आधारकार्ड
- पत्त्यात बदल
- नावात बदल
- जन्मतारखेत बदल
- ईमेल आयडी अपडेट
- जेंडर अपडेट
- बायोमॅट्रिक बदल
घ्यावी लागणार अपॉइंटमेंट–
आधार सेवा केंद्रावर लोकांना आधीच ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. ज्याप्रमाणे पासपोर्ट बनवण्यासाठी आधी अपॉइंटमेंट घेऊन तारीख व वेळ निश्चित करावी लागते त्याप्रमाणेच हे असणार आहे. सेवा केंद्रावर 8 ते 16 काउंटर असतील. वेटिंग एरियामध्ये 40 ते 80 सीट आणि इलेक्ट्रॉनिक टोकन सिस्टम सारख्या सेवा मिळतील.
लोकांना युआयडीएआयची वेबसाइट https://uidai.gov.in/ जाऊन माय आधार टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर बुक अपाइंटमेंट टॅबवर जाउन तारीख निश्चित करावी लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र आधारमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी 50 रूपये शुल्क आकारले जाईल.