राणू मंडलबाबत गानकोकिळीने दिली प्रतिकिया


रेल्वे स्थानकावर गानकोकिळा लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गाणे गाऊन रानू मंडल या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांच्या आवाजाला काहींनी तर थेट लतादीदींच्या आवाजाची उपमा दिली. त्याचबरोबर त्यांना हिमेश रेशमियाने दिलेल्या संधीमुळेही त्या प्रसिद्ध झाल्या. यावर आता गानकोकिळा लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

लतादीदींनी एका माध्यमाशी बोलताना राणूबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर कोणाचे माझ्या गाण्यांमुळे भले होत असेल तर त्यात मला आनंदच आहे. पण तुम्हाला इतर मोठ्या कलाकारांची गाणी गाऊन ठराविक काळासाठी प्रसिद्धी मिळेल. त्यात नवनिर्मितीक्षमता नसल्यास ती प्रसिद्धी फार काळ टिकू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक मुले गातात. पण त्यांना सुरुवातीच्या यशानंतर कोण लक्षात ठेवतो? मला फक्त सध्या सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल हीच नावे माहित असल्यामुळे इतरांची गाणी जरूर गा. पण त्यात ठराविक वेळानंतर स्वतःचेही काहीतरी द्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पुढे त्या आशा भोसले यांचे उदाहरण देताना म्हणाल्या, की आशाने आज स्वतःच्या गाण्यांची वेगळी ओळख निर्माण केली. म्हणून, ती यशस्वी ठरू शकली. नाही तर माझी सावली म्हणून ती राहिली असती.

Leave a Comment