प्रेमी जीवांचे मिलन घडविणारा ईश्किया गणेश


देशात सध्या गणेशोत्सव सुरु आहे. गणेश सुखकर्ता आणि वरदविनायक म्हणूनही ओळखला जातो. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा गणेश अनेक नावानी आणि अनेक रुपात पुजला जातो. राजस्थानच्या जोधपुर शहरात निमुळत्या अरुंद गल्लीत एक गणेश मंदिर असून त्याला ईश्किया गजानंद मंदिर म्हटले जाते. हा बाप्पा प्रेमी जिवांचे मिलन घडवून आणतो अशी श्रद्धा आहे. या मंदिरात येणाऱ्या प्रेमींचे प्रेम सफल होते असे सांगितले जाते.

हे मंदिर सुमारे १०० वर्षे जुने आहे. प्रेमात पडलेल्या ज्या युगुलाचा विवाह होण्यात काही अडचणी आहेत, म्हणजे घराची परवानगी नसणे, जात पात बंधनामुळे विवाहात अडचण अशी युगुले या मंदिरात नियमित दर्शनाला आली तर ईश्किया गणेशाच्या आशीर्वादाने त्याचे प्रेम सफल होते, लग्नगाठ बांधली जाते असे सांगतात. पूर्वी या मंदिरात येणारी युगुले चोरीछिपे येत असत आणि हे मंदिर हेच त्यांचे भेटण्याचे ठिकाण असे तेव्हापासून या मंदिराला ईश्कीया गणेश असे नाव पडले आहे.

प्रत्येक बुधवारी येथे दर्शनासाठी मोठी रांग असते. हा गणेश भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो असाही स्थानिकांचा विश्वास आहे. ज्या घरात लग्नाळू मुले मुली आहेत आणि ज्यांचे विवाह जमत नाहीत असे कुटुंबीय सुद्धा येथे येऊन गणेशाला विवाह जमविण्यासाठी नवस करतात असे समजते.

Leave a Comment