इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रेणुका कुमारी नावाच्या हिंदू मुलीचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. पाकिस्तानमधील हिंदूंच्या हक्कांसाठी काम करणार्या अखिल पाकिस्तान हिंदू पंचायत संघटनेने फेसबुक पोस्टमध्ये दावा केला आहे. यापूर्वी गुरुवारी पंजाब प्रांतातही अशीच एक घटना समोर आली होती.
पाकमध्ये पुन्हा एकदा हिंदु मुलीचे जबरस्तीने धर्मांतर
रेणुकाचे सिंध प्रांतातील सुकुर येथील तिच्या कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (आयबीए) मधून अपहरण झाले. ती बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेत होती. 29 ऑगस्ट रोजी मुलगी महाविद्यालयात सोडल्यापासून बेपत्ता आहे. मुलगी अद्याप आपल्या कुटूंबात परतली नव्हती.
मुलीचा भाऊ विनेशने एका वृत्तसंस्थेला सांगितले की तिची बहिणीचे बाबर अमन याच्याशी प्रेमसंबंध होते, तो तिच्याबरोबरच शिकत होता आणि लग्नानंतर ते दोघेही आता सियालकोटमध्ये आहेत. सुत्रांकडून दावा केला जात आहे की ती मुलगी सध्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफच्या (पीटीआय) कार्यकर्त्या मिर्झा दिलावर बेग यांच्या घरी आहे. या अनुषंगाने पोलिसांनी शनिवारी रात्री अमनच्या भावाला अटक केली.
यापूर्वी पंजाब प्रांतातील गुरुद्वाराच्या ग्रंथीच्या मुलीला बंदुकीच्या धाकावर अपहरण करून तिचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचीही घटना समोर आली होती. जगजित कौरचे वडील आणि भाऊ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पंजाबचे राज्यपाल यांची भेट घेतली आणि तिला घरी परत आणण्यासाठी मदत मागितली.
सध्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतातील अल्पसंख्याकांविरूद्ध भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. विशेषत: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान तेथील मुसलमानांवरील अत्याचाराबद्दल सातत्याने बोलत आहे. अशा परिस्थितीत या दोन प्रकरणांच्या अस्तित्वामुळे पाकिस्तानचे दुटप्पी भूमिका समोर आली आहे.
पाकिस्तानमध्ये वारंवार अल्पसंख्यांकांचे जबरदस्तीने धर्मांतराचा मुद्दा नोंदविला जात आहे. यापूर्वी यावर्षी मार्च महिन्यात दोन हिंदू मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने पाकिस्तानमध्ये धर्मांतर केल्याच्या प्रकरणात वाद झाला होता. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यानंतर पाकिस्तानने ती आपली अंतर्गत बाब असल्याचे स्पष्ट केले होते.