या 20 शेफनी मिळून 10 दिवसात बनवला चॉकलेटचा बाप्पा


गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर देखील युजर्स देखील लाडक्या गणरायाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.  अनेकजण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहे. अशीच एक इको-फ्रेंडली गणेशमूर्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.


रेस्टोरंट मालक हरिंदर सिंह कुकरेजा यांनी चॉकलेटपासून बनवलेल्या गणेशमूर्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.हरिंदर यांनी पोस्ट करत सांगितले की, चॉकलेट गणपती बनवण्यासाठी 20 शेफना 10 दिवस लागले. ही मुर्ती बनवण्यासाठी 100 किलो बेल्जियन चॉकलेटचा वापर करण्यात आला.


फोटो शेअर केल्यापासून आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक जणांनी लाइक केले आहे तर 350 जणांनी हा फोटो रिट्विट केला आहे. एका युजरने लिहिले की, एकदम मस्त. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हे खरच अद्भुत वाटत आहे. हरिंदर सिंह कुकरेजा हे मागील चार वर्षांपासून इको-फ्रेंडली गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी अशाप्रकारे गणेशमुर्ती बनवत आहे.

Leave a Comment