इंडोनेशियाचे कमोडो बेट जानेवारी २०२० पासून पर्यटनासाठी बंद


पर्यटनासाठी इंडोनेशिया हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मात्र येथील प्रसिद्ध कमोडो आयलंडवर येत्या जानेवारी २०२० पासून पर्यटक जाऊ शकणार नाहीत कारण काही काळासाठी हे बेट पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय इंडोनेशियन सरकारने जाहीर केला आहे. या आयलंडचे वैशिष्ट म्हणजे येथे जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या अजस्र पाली सापडतात. या पाली नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. ही प्रजाती सुरक्षित ठेवण्यासाठी हे आयलंड काही काळ पर्यटनासाठी बंद केले जात आहे असे संगितले गेले आहे.


कमोडो बेटावर आढळणाऱ्या या विशालकाय पालीना कमोडो ड्रॅगन असे म्हटले जाते. या दुर्लंभ पाली पाहण्यासठी जगभरातून येथे पर्यटक येत असतात. गेले काही वर्षे येथे या पालींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे तसेच पर्यटक संख्या वाढल्याने त्यांच्या अधिवासात माणसांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे या पालींची संख्या घटत चालली आहे. सध्या या बेटावर अंदाजे १७०० पाली आहेत. २०१८ मध्ये या बेटाला १.७६ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. सध्या किमान वर्षासाठी हे आयलंड बंद ठेवले जाणार असून त्यानंतर प्रवेश शुल्कात भरपूर वाढ करून ते खुले केले जाईल असे समजते.


या कमोडो ड्रॅगनच्या काही जाती विषारी आहेत. तरीही या बेटावर एका गावात माणसांची वस्ती आहे. हे गावकरी या पालींसोबत बिनधास्त राहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार या ड्रॅगन बरोबर त्यांचे अध्यात्मिक नाते आहे. येथील राजकुमारीने एका ड्रॅगनच्या मुलाला जन्म दिला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. अर्थात हे आयलंड बंद केले गेल्यावर या गावातील रहिवाश्यांनाही दुसरीकडे स्थलांतरित केले जाणार आहे.

Leave a Comment