महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती


मुंबई: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रविवारी राष्ट्रपती भवनातून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर झाले. मंगळवारपासून ते राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारतील.

सी. विद्यासागर राव यांनी ३० ऑगस्ट २०१४ रोजी यापूर्वी राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपुष्टात आल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते.

१७ जून १९४२ रोजी भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म झाला. उत्तराखंड राज्यात भाजपचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. उत्तराखंडमधील भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २००१ ते २००२मध्ये त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्या राज्याचा कारभार केला. सन २००२ पासून २००७ पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सन २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. भगत सिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत.

महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगण या राज्यांतही नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपचे उत्तरेतील ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून हिमाचल प्रदेशचे राज्यपालपद बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांची केरळ, तर तमिलीसाई सुंदरराजन यांची तेलंगणच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment