बेस्ट कंडक्टरच्या मुलाची टीम इंडियात निवड


मुंबई: एकेकाळी आपल्या देशात फक्त श्रीमंत व्यक्तिच क्रिकेट खेळत होते. पण त्यानतंर काळ बदलत गेला आणि सर्वसामान्य घरातील तरुणांची क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आणि त्यांनी क्रिकेटच्या मैदानात आपले वर्चस्व गाजवले. सुनील गावस्कर पासून सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातून येत आपले क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. या यादीत आता आणखी एक नवे नाव जोडताना दिसणार आहे. कारण, मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्याचा मुलगा अथर्व याने खेळण्याची जिद्द, मेहनत याच्या जोरावर टीम इंडियात स्थान मिळवले आहे.

मुंबईतील बेस्ट बसच्या कर्मचाऱ्याचा अथर्व अंकोळेकर हा मुलगा आहे. अथर्वची भारतीय क्रिकेटच्या अंडर 19 संघामध्ये निवड झाली आहे. भारतीय अंडर 19 चा संघ पुढील महिन्यात श्रीलंकेत युथ एशिया कप (युवा आशिया चषक) खेळण्यासाठी जाणार आहे. ध्रुव चंद जुरेल या टीमचे नेतृत्व करणार आहे आणि याच संघामध्ये अथर्व अंकोळेकर याची निवड झाली आहे.

आपली आई वैदेही अंकोळेकर आणि संपूर्ण परिवाराचे नाव 18 वर्षीय अथर्व अंकोळेकरने मोठे केले आहे. अथर्व नऊ वर्षांचा असताना त्याचे वडील विनोद यांचे निधन झाल्यानंतर अथर्वची आई वैदेही यांनी त्याचा सांभाळ केला. अथर्व डावखुरा फिरकी गोलंदाज असून आतापर्यंत त्याने भारत बी अंडर 19 संघ, भारत ए अंडर 19 आणि अफगाण अंडर 19 या संघासाठी तीन मॅचेस खेळल्या आहेत. मुंबईतील रिझवी कॉलेजमध्ये 12वीचे शिक्षण घेणाऱ्या अथर्वची आता टीम इंडियात निवड झाली आहे.

Leave a Comment