सूर्यकिरणे करतात या गणेशाची पाद्यपूजा


घरोघरी येत्या २ सप्टेंबरला सर्वाच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. त्यापुढील १० दिवस गणराजाचा हा उत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा होईल. कोणत्याची पूजेत प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पांचा आहे. देशात एकही गाव असे नसेल जेथे गणेश मंदिर नाही. अर्थात भारतात अनेक प्रसिद्ध गणेश मंदिरे आहेत आणि बहुतेक मंदिराचे काही ना काही विशेष आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथे असलेल्या श्वेत सिद्धिविनायक मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथे सर्वप्रथम सूर्यदेव गणेशाची पाद्यपूजा करतात. जयपूरच्या सुरजपोल बाजार येथे हे मंदिर आहे.

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे येथे गणेशाबरोबर राधा कृष्ण आणि यमाचे दिवाण चित्रगुप्त याचीही मंदिरे आहेत. पांढर्याशुभ्र संगमरवरात बनविलेल्या या सुंदर गणेश मूर्तीच्या चरणांवर सूर्याची पहिली किरणे पडतात. या गणेशाची मनोभावे प्रार्थना करणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. यामुळेच या गणपतीला श्वेत सिद्धिविनायक असे नाव दिले गेले आहे. जयपूरचे महाराणा सवाई रामसिंह यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधले गेले असून गणेशाची दक्षिणवृत्ती श्वेत प्रतिमा येथे स्थापन केली गेली आहे.

गणेश स्थापना करताना तांत्रिकविधी विधानाने केली गेली आहे. त्यामुळे या गणेशाला सिंदूर, कुंकू वाहिले जात नाही. दुध, पाणी आणि गणेशोत्सवाच्या वेळी उसाच्या रसाने अभिषेक केला जातो. गणेशाची प्रतिमा चतुर्भुज असून सर्पाकार मणिबंध आणि पायात पैजण आहेत. या मंदिरात यमाचे दिवाण चित्रगुप्त यांचेही मंदिर असून ते ईशान्य कोपऱ्यात आहे. लोकांच्या पापपुण्याच्गा हिशोब चित्रगुप्त ठेवतो आणि आजही ठेवतो असा लोकांचा विश्वास आहे.

Leave a Comment