देशातले सर्वात मोठे गणेश मंदिर

ahmadabad-ganesh
सध्या देशभर गणेशोत्सव सुरू आहे. देशभरातल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी केलेली आरास पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत तसेच आपापल्या शहरातील खास गणेश मंदिरातही दर्शनासाठी गर्दी करत आहेत. सोमनाथ,पावागड, अंबाजी, अक्षरधाम यासारखी अतिभव्य मंदिरे असलेल्या गुजराथमध्येच देशातील सर्वात मोठे गणेश मंदिर उभारले गेले असून हे सिध्दीविनायकाचे मंदिर आहे.

अहमदाबाद जवळ महेमदाबाद येथे ६ लाख चौरस फुट परिसरात हे मंदिर उभारले गेले असून त्याचे भूमीपूजन ७ मार्च २००७ रोजी केले गेले होते. वर्षापूर्वी हे मंदिर पूर्ण झाले आहे. वात्रक नदीकाठी असलेले हे मंदिर गणेशाच्या आकारातच बांधले गेले आहे. मंदिरातील गणेशाची स्थापना जमिनीपासून २० फूट उंचीवर केली गेली असून एकूण उंची ५६ फुटांची आहे. मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरातून आणलेली ज्योत येथे स्थापन केली आहे आणि त्यामुळेच या गणेशाला सिद्धीविनायक म्हणूनच ओळखले जाते. मंदिरात जाण्यासाठी जिना आणि लिफटची सोय केली गेली आहे.

मंदिराच्या आवारात प्रचंड आकाराचे स्वतिक आकारात बगीचे आहेत आणि छोटे झरे, कारंजी यांनी ते सजवले गेले आहेत. हा गणेश नवसाला पावतो असा भाविकांचा समज असल्याने देशभरातून भाविक या गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. येथे लाडूचा नैवेद्य दाखविला जातो.

Leave a Comment