19 लाखांपेक्षा अधिक लोक एनआरसीच्या अंतिम यादीतून बाहेर


गुवाहाटी – शनिवारी आपली अंतिम यादी नॅशनल सिटिझनन रजिस्टरने (एनआरसी) जारी केली आहे. एनआरसीचे राज्य समन्वयक प्रतिक हजेला यांनी सांगितल्याप्रमाणे, 19 लाख 6 हजार 657 लोक शेवटच्या यादीतून बाहेर काढण्यात आले आहेत. बाहेर काढलेल्यांमध्ये प्रामुख्याने ज्या लोकांनी कुठलाही दावा सादर केला नाही, त्यांचाच समावेश आहे. 3 कोटी 11 लाख 21 हजार 4 लोकांना वैध ठरवण्यात आले आहे. या यादीवर कुणालाही आक्षेप असल्यास ते फॉरेनर्स ट्रिब्यूनलमध्ये अपील दाखल करू शकतात. विशेष म्हणजे, एनआरसीने गतवर्षी 21 जुलै रोजी 3.29 कोटी लोकांपैकी 40.37 लाख लोकांच्या नावांचा समावेश केला नव्हता. 25 मार्च 1971 पूर्वीपासून जे लोक आसामचे नागरिक आहेत किंवा या ठिकाणी त्यांचे पूर्वज राहत होते अशाच लोकांचा यादीत समावेश करण्यात आला.

इंटरनेट आणि राज्याच्या 2500 एनआरसी सेवा केंद्रांमध्ये, 157 अंचल कार्यालय आणि 33 जिल्हा उपायुक्तालयांमध्ये ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या दरम्यान आसामात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने हिंसाचार आणि दंगलींच्या शक्यता लक्षात घेता शांततेचे अपील केले आहे. पोलिसांनी जारी केलेल्या सूचनांमध्ये कुठल्याही फेक न्यूज, अफवा आणि ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. गुवाहाटीसह 5 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Leave a Comment