अखेर छगन भुजबळांची होणार घरवापसी


मुंबई : अखेर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या (1 सप्टेंबर)दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात कार्यकर्त्यांचं मोठं संघटन असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. पण या चर्चा भुजबळ यांच्याकडून वारंवार फेटाळल्या जात होत्या. पण आता भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. छगन भुजबळ हे शिवसेना प्रवेशावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पोहोचणार आहेत.

सध्या राज्याच्या ‘संवाद’ यात्रेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. त्यांच्या यात्रेचा मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणणं आणि पक्षाला लागलेली गळती रोखणे हा मुख्य उद्देश आहे. ही यात्रा पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. या यात्रेत प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते हजेरी लावत आहेत. पण ही यात्रा जेव्हा नाशिकमध्ये आली तेव्हा सुप्रिया यांच्या सोबत पक्षाचे दिग्गज नेते छगन भुजबळ दिसले नाहीत. नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला समजला जातो. गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीची नाशिकमधली एकहाती सत्ता ही भुजबळांच्या हातात होती. मात्र ते सध्या पक्षावर नाराज असल्याने त्यांनी संवाद यात्रेकडे पाठ फिरवत शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले होते.

Leave a Comment