मुन्नाभाई एसएससी रिक्षावाल्याचा आनंदाचा फंडा


रिक्षा अथवा कॅबमधून जाताना अनेक प्रवाशांचा रिक्षाचालक अथवा कॅबचालकांशी अनेकदा वाद होतो हे बहुतेक शहरातील नित्याचे दृश्य आहे. मुंबईच्या बांद्रा भागातील एक रिक्षावाला मात्र याला अपवाद असून आपल्या रिक्षातून उतरताना प्रवाशांनी आनंदात हसत उतरावे यासाठी तो नेहमी दक्ष असतो आणि त्यासाठी त्याने एक वेगळा फंडा वापरला आहे. त्याने ह्युमनस ऑफ बॉम्बे या नावाच्या फेसबुक पेजवर त्याची माहिती दिली आहे. सलमान आणि संजय दत्तचा प्रचंड चाहता असलेला हा रिक्षावाला मुन्नाभाई एसएससी आणि किंग ऑफ बांद्रा या नावाने प्रसिद्ध आहे.

तो म्हणतो गेली १९ वर्षे मी रिक्षा व्यवसायात आहे. रिक्षावाल्यांबरोबर प्रवासी अनेकदा वादावादी करतात. मला मात्र आपल्या रिक्षातून प्रवासी उतरताना समाधानाने, आनंदाने उतरावेत असे वाटते. म्हणून मी रिक्षात खाद्यपदार्थ, पाणी ठेवतो, मेडिकल बॉक्सही ठेवली आहे. वायफाय सुविधा आहे. रिक्षात वर्तमानपत्र ठेवतो, घड्याळ आहे. शिवाय संजय दत्त आणि सलमान माझे आवडते हिरो आहेत त्यामुळे त्याच्या वाढदिवशी मी प्रवाशांकडून पैसे न घेता त्यांना फुकट राईड देतो. रक्षाबंधनाच्या दिवशी महिला प्रवाशांकडून पैसे घेत नाही आणि व्हॅलेंटाइन डे दिवशी प्रेमी युगुलाला मोफत नेतो.

वरील दिवशी प्रवाशांना जायचे आहे तेथे सोडले कि मग मी भाडे देऊ नका असे सांगतो त्यामुळे त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. मग मी मोफत राईड मागचे कारण सांगतो तेव्हा ते खूप खुश होतात. दिवसाकाठी चार प्रवासी असे आनंदात उतरले तरी माझ्यासाठी ते खूप मोठे काम असते. मुन्नाभाई एसएससी चा टीव्हीवर परिचय करून दिला गेला आहे तसेच त्याच्यावर डॉक्यूमेंटरी सुद्धा बनविली गेली आहे.

Leave a Comment