ब्रह्मचारी राहू इच्छिणाऱ्या बाप्पाची अशी झाली दोन लग्ने


सर्वांचा आवडता, सुखकर्ता, दु;खहर्ता गणपती बाप्पा आता काही दिवसांच्या मुक्कामासाठी येत आहे. गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला गेला आहे. गणेशाच्या अनेक गोष्टी पुराणात विशेषतः गणेश पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. कोणत्याही घरात विवाह ठरला कि विवाहाच्या तयारीची सुरवात करण्यापूर्वी गणेश पुजला जातो. पण पुराणात एक कथा अशी येते कि गणपती हा पूर्वी विघ्नहर्ता म्हणून नाही विघ्नकर्ता होता.

एका कथेनुसार गणपतीने ब्रम्हचारी राहण्याचा निर्णय घेतला होता. गणेश तपस्या करत असताना तुळशीचे मन त्याच्यावर गेले आणि तिने त्याला विवाहाची इच्छा सांगितली पण गणेशाने नकार दिला. रागावलेल्या तुळशीने त्याला तुझी दोन लग्ने होतील असा शाप दिला तर गणेशाने तिला तुझे लग्न असुराशी होईल असा शाप दिला. यामुळे गणेश पूजेत तुळस वाहिली जात नाही.

दुसरी कथा सांगते, गणेशाला लग्न करायचे होते पण त्याच्याशी विवाह करण्यासाठी कुणी तयार होत नव्हते. गणेशाचे हत्तीचे डोके, पुढे आलेले पोट यामुळे त्याला स्वतःच्या रूपाचा तिटकारा होता. या रुपामुळे त्याच्याशी कुणी विवाह करण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे ज्या कोणाचा विवाह होणार असे कळेल तेथे गणेश विघ्न आणत असे आणि या कामी उंदीर त्याला सहाय्य करत असे. यामुळे देवी देवता त्रासले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला काही तरी मार्ग काढा अशी विनंती केली.

ब्रह्मदेवाने योगाने दोन कन्या निर्माण केल्या. या त्याच्या मानस कन्या म्हणजे रिद्धी आणि सिद्धी. एखाद्याचा विवाह होणार असेल तर गणेशाने त्यात विघ्न आणू नये म्हणून या दोघी त्याचे आणि उंदराचे लक्ष विचलित करत असत. त्यामुळे लग्ने विघ्न न येता पार पडू लागली. गणेशाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने रिद्धी सिद्धीला शाप देण्याचा विचार केला इतक्यात ब्रह्मदेव तेथे आले आणि त्यांनी या दोघींचा विवाह गणेशाशी करून दिला. गणेशाला शुभ आणि लाभ अशी दोन मुले झाली. म्हणजे गणपतीबाप्पाच्या कुटुंबात दोन पत्नी आणि दोन मुले आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment