खंडित होणार आर. के. स्टुडिओची 70 वर्षांची परंपरा


आर. के. स्टुडिओत गेल्या 70 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात होता. 70 वर्षांपूर्वी राज कपूर यांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. या उत्सवात बॉलिवूडमधील कलाकार, स्टुडिओत काम करणारी मंडळी सगळेच जण आनंदाने सहभागी होत होते. पण यावर्षीपासून ही परंपरा खंडीत होणार आहे. ‘आर. के. स्टुडिओ विकला आता गणेशोत्सवासाठी जागाच नसल्यामुळे गणेशोत्सव यावर्षीपासून साजरा केला जाणार नाही, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाला रणधीर कपूर यांनी दिली.

आम्ही गेल्यावर्षी शेवटचा गणेशोत्सव साजरा केला. आर. के. स्टुडिओच आता राहिला नसल्यामुळे गणेशोत्सव कुठे साजरा करणार? आमच्याकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आता जागाच नाही. आमची गणेशावर श्रद्धा आहे, पण गणेशोत्सवाची परंपरा पुढे सुरू ठेवू असे मला वाटत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हा स्टुडिओ मे महिन्यात ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने खरेदी केला. आता या ठिकाणी आलिशान अशी निवासी संकुल बांधण्यात येणार आहेत. आर.के. स्टुडिओ विकत घेण्याचा मानस कंपनीने ऑक्टोबर २०१८ मध्ये कपूर कुटुंबीयांकडे बोलून दाखवला होता. २.२ एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक आणि आलिशान असे निवासी संकुल बांधण्यात येणार आहेत अशी माहिती गोदरेज प्रॉपर्टीजने दिली. स्टुडिओला गेल्यावर्षी लागलेल्या आगीचा मोठा फटकाही बसला होता तसेच त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment