भिकेचे डोहाळे लागले असताना भारताबरोबर युध्द पाकला झेपेल का ?


जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान वारंवार भारताला युध्दाच्या धमक्या देत आहे. भारताबरोबर अनेक औद्योगिक व्यापार संबंध देखील पाकिस्तानने रद्द केले. मात्र पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती बघता पाकिस्तान खरचं युध्द करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे का ?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला गेली आहे. पंतप्रधान कार्यालयाला देखील वीजेचे बिल भरले नाही म्हणून नोटिस बजावण्यात आली आहे. या एकाच घटनेवरून पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्धवस्त होण्याच्या स्थितीत आहे हे दिसून येते. याचबरोबर गाडी खरेदीपासून ते सरकारी कार्यालयात चहावर देखील पाकिस्तानमध्ये बंदी आणण्यात आली आहे.

जागतिक बँकेनुसार, 2018 पर्यंत पाकिस्तानची जीडीपी 254 अब्ज डॉलर होती तर भारताची जीडीपी 2.84 ट्रिलियन होती. म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था ही पाकिस्तानच्या 11 पटीने अधिक आहे. भारताचा आर्थिक वृध्दी दर हा 7 टक्के जरी राहिला तरीही अर्थव्यवस्थेमध्ये 200 अब्ज डॉलर जोडले जातील जे पाकिस्तानच्या 2018 च्या जीडीपीच्या 80 टक्के एवढे आहे.

पाकिस्तानचा आर्थिक वृध्दी दर हा 4.3 टक्क्यांनी वाढत आहे. आयएमएफनुसार, 2019-20 मध्ये पाकिस्तानचा वृध्दी दर हा 3 टक्क्यांवर येईल. मे 2019 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर हा 9 टक्क्यांवर पोहचला होता. येणाऱ्या काळात देखील पाकिस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात देखील मोठ्या प्रमाणात तूट आहे. पाकिस्तानचे सरकार महसूल उत्पादन भरून काढण्यासाठी वारंवार कर्ज घेत आहे. पाकिस्तानच्या अर्थसंकल्पातील तूट ही 8.9 टक्क्यांवर पोहचली असून, मागील तीन दशकातील ही सर्वात मोठी तूट आहे.

पाकिस्तानच्या रूपयाचा विनिमय दर देखील विक्रमी स्तरावर पोहचला आहे. मे महिन्यात पाकिस्तानचा रूपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 140 रूपयांवर पोहचला होता तर आता पाकिस्तानच्या रूपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 157 वर पोहचली आहे.

मार्च 2019 मध्ये पाकिस्तानवर 6 लाख करोड रूपयांचे कर्ज होते. चीन ते सउदी अरब सर्वांकडून पाकिस्तानने कर्ज घेतले आहे.पाकिस्तानने काही दिवसांपुर्वीच आयएमएफकडून काही अटींवर बेलआउट पॅकेज घेतले आहे. आयएमएफच्या अटीनुसार पाकिस्तानला या वर्षीचा महसूल 40 टक्के वाढवावा लागेल.

काही महिन्यांपुर्वीच आयएमएफने पाकिस्तानला फटकारले होते. आयएमएफने म्हटले होते की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर आहे. खराब आर्थिक धोरणे, अर्थसंकल्पातील तूट, ओवरवॅल्यू एक्सचेंज रेट, कर्ज यामुळे पाकिस्तान अशा परिस्थितीत अडकला आहे. पाकिस्तानच्या या खराब परिस्थितीला जबाबदार तेथील अपारदर्शी राजकीय व्यवस्था आहे, जी सैन्याच्या इशाऱ्यावर कार्य करते. अर्थव्यवस्थेपासून ते शस्त्र सामग्रीपर्यंत सर्वांमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा वरचढ असल्याचे दिसून येत आहे.  अर्थव्यवस्था एवढी रसातळाला असताना देखील पाकिस्तानचे नेते भारताबरोबर युध्दाच्या धमक्या देत आहेत.

Leave a Comment