बाजारात आले नाविन्यपूर्ण थ्रीडी जेली मोदक


बाप्पाचे आगमन आता दोन दिवसांवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे बाप्पा साठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूंनी गावोगावीचे बाजार ओसंडू लागले आहेत तसेच मिठाईच्या दुकानातून प्रसादासाठी विविध प्रकारच्या मिठाया बनू लागल्या आहेत. बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गावोगावीचे हलवाई त्यासाठी विविध प्रकारचे मोदक तयार करू लागले आहेतच पण मुंबईच्या पवई भागात कॅफे चालविणाऱ्या प्रिया चमणकर यांनी युनिक थ्रीडी जेली मोदक तयार केले आहेत. हे मोदक कसे बनवायचे याचे प्रशिक्षणही त्या देत आहेत.

हे मोदक बनविण्यासाठी दुध, गुळ, नारळ, नारळाचे दुध, साखर, पाणी याच पारंपारिक पदार्थांचा वापर केला जात आहे. प्रिया सांगतात, या मोदकांना मूळ मोदकासारखाच स्वाद आहे. मोदकावर जिलेटीनवर सुईच्या मदतीने गोड पुडिंग मध्ये फुलांची आकर्षक नक्षी तयार केली गेली आहे. हे मोदक अनेक रंगात बनविता येत असल्याने ते फारच आकर्षक दिसत आहेत. हे मोदक चार दिवस टिकतात. जपान मध्ये थ्रीडी जिलेटीन आर्ट प्रसिद्ध असून युट्यूबवर त्याची माहिती देणारे अनेक व्हिडीओ आहेत. त्यावरून प्रेरणा घेऊन प्रिया यांनी हे मोदक बनविले आहेत.

प्रिया मुळच्या आर्कीटेक्ट. काही वर्षापूर्वी त्यांनी नोकरी सोडली असून त्या पवई येथे कॅफे चालवितात. यापूर्वी त्यांनी थ्रीडी केक बनविले होते आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता म्हणून यंदा त्यांनी थ्रीडी मोदक बनविण्याचा प्रयोग केला आहे.

Leave a Comment