पोलिसांनी अडविली विचित्र थ्री इन वन कार


स्वयंचलित वाहनाचा शोध माणसासाठी वरदान ठरला आणि आज तर माणूस विविध प्रकारची वाहने वापरात आणू पाहतो आहे. इंग्लंडच्या बेडफोर्डशायर वाहतूक पोलिसांनी रस्त्यात विचित्र दिसणारे एक वाहन नुकतेच अडविले पण त्या पोलिसाला हे वाहन नक्की काय आहे ते समजले नाही म्हणून त्याने या वाहनाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले. या वाहनाला मोटारबाईकचे हँड्ल, पुढची बाजू विमानाप्रमाणे तर मागची बाजू बोटीप्रमाणे आहे. म्हणजे हे एकप्रकारे थ्री इन वन वाहन आहे. सोशल मिडीयावर या वाहनाचे फोटो व्हायरल झाल्यावर ब्रिटन मधील तीन राज्यातील वाहतूक पोलिसांनी सुद्धा या वाहनाचे फोटो शेअर केले आहेत.

एका वाहतूक पोलिसाने हे फोटो शेअर करताना त्याच्या २६ वर्षाच्या नोकरीत त्याने रस्त्यावर अडविलेले हे सर्वात विचित्र वाहन असल्याचे म्हटले आहे. या वाहनाचा मालक किराणा सामान खरेदी करून या वाहनातून रस्त्यावरून अन्य वाहनांसोबत चालला होता.

पोलिसांनी या विचित्र वाहनाच्या मालकाकडे वाहनाची सर्व कायदेशीर कागदपत्रे मागितली. तेव्हा वाहनाची नोंदणी योग्य प्रकारे केली गेली असून वाहनाला नंबरप्लेट, रजिस्टर बुक असून वाहनाचा विमा, कर योग्य प्रकारे भरला गेल्याचे आढळले. या वाहनाचे ब्रेक, लाईट सर्व सुस्थितीत असल्याने पोलीस कोणतीही कारवाई करू शकले नाहीत. फक्त पोलीस हे नक्की कोणते वाहन आहे याचा तर्क करू शकले नाहीत. या वाहनाचा रंग पांढरा असून रस्त्यावरून जाताना या वाहनाचा त्रास रस्त्यावरच्या अन्य कोणत्याची वाहनांना झाला नाही असे समजते. फक्त शेजारी वाहनातील लोक या वाहनाकडे कुतूहलाने बघत होते.

Leave a Comment