पाकिस्तानात सोने भाव ९० हजारांवर


भारतात गेले काही दिवस सोन्याच्या भावांनी ४० हजाराची पातळी गाठून उच्चांक नोंदविल्याची चर्चा सुरु असतानाच शेजारी राष्ट्र पाकिस्तानने सोने भावात ९० हजार रुपये तोळा असा जागतिक उच्चांक नोंदविला आहे. सिंध सराफ अँड ज्युवेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हारून चांद यांनी द एक्स्प्रेस ट्रिब्युनला दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने गेल्या सहा वर्षातील उच्चांक नोंदवून औसाला १५५९.७५ डॉलर्सची (१ औंस = ३१.१० ग्रॅम ) पातळी गाठल्यावर पाकिस्तानात बुलियनच्या भावात सुधारणा करून सोन्यात तोळ्याला ९०० रुपये वाढ होऊन सोने ९० हजार रुपये तोळा झाले आहे.


भारतात सोमवारी वायदा बाजारात सोन्याचा भाव १० ग्रॅमला ३९,४२५ रुपये तर किरकोळ विक्रीसाठी ४० हजार रुपये होता. द. एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार लंडन बुलियन मार्केट मध्ये सोने १५ डॉलर्सने वाढून १५४५ डॉलर्स प्रती औंसवर गेले.


अमेरिका आणि चीन या देशात सध्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा जगाच्या अर्थव्यापारावर प्रभाव पडेल या भीतीने सोने भाव वाढत चालले आहेत. अनेक देश त्यांच्या विदेशी मुद्रा भांडाराचा काही हिस्सा सोन्यात परिवर्तीत करत आहेत. चीन आणि अमेरिकामध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धाने या दोन्ही देशांचे चलन बाधित झाले आहेच पण त्याचा प्रभाव अन्य देशांच्या चलनावर पडत आहे. पाकिस्तानात काही दिवसापूर्वी सोन्याची दररोजची मागणी १० हजार तोळे इतकी होती पण आता दर खूपच वाढल्याने ती २ ते ३ हजार तोळ्यावर आली असल्याचे चांद यांनी सांगितले.

Leave a Comment