पाक विद्युत कंपनी गुल करणार इम्रान खान यांच्या कार्यालयाची बत्ती


काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ असे म्हणत भारताला वारंवार धमकी देणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सचिवालयात अंधार पसरण्याची शक्यता आहे. कारण, लाखोंच्या घरात असलेल्या वीजेच्या बिलाचा भरणा न केल्यामुळे त्यांच्या कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

बुधवारी एक नोटीस द इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी म्हणजेच ‘इस्को’कडून संबंधित प्रकरणी बजावण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आणि पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या वृत्तांनुसार पाकिस्तानच्या पंतप्रधांनांच्याकडून सध्याच्या घडीला ‘इस्को’ला ४१ लाख रुपयांची रक्कम दिली जाणे अपेक्षित आहे. ही रक्कम गेल्या महिन्यापर्यंत ३५ लाख रुपयांच्या घरात होती.

‘इस्को’शी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार वारंवार नोटीस देऊनही पंतप्रधान कार्यालयाकडून त्यावर कोणतेच उत्तर मिळालेले नाही, त्याचबरोबर थकलेली रक्कमही भरण्यात आलेली नाही. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहिल्यास संपूर्ण कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशाराही या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Leave a Comment