गौतम गंभीरच्या ट्विटने उडवली आफ्रिदीची झोप


मुंबई: आपल्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर एकमेकांना ठसण देत आले आहेत. त्यांची मैदानातील कारर्किद संपल्यानंतर देखील दोघेही एकमेकांना कायम ठसण देत असल्याचे चित्र आपण वारंवार पाहत आहोत. पण आता दोघंही सोशल मीडियावरुन एकमेकांना उत्तर-प्रत्युत्तर देत आहेत. शाहिद आफ्रिदीने आतापर्यंत काश्मीर मुद्द्यावर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहते. त्याच्या या वक्तव्यांना गौतम गंभीरने नेहमीच सडेतोड उत्तर दिले आहे. आता पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावर आफ्रिदीने आपले थोबाड उघडले आणि ट्विटरवर याबाबत टिवटिवाट केली आहे. त्याच्या या टिवटिवाटीला आता गंभीरने उत्तर दिले आहे.

आफ्रिदीने बुधवारी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने असे म्हटलं आहे की, काश्मिरी नागरिकांच्या समर्थनासाठी पंतप्रधान इमरान खान यांनी सुरु केलेल्या ‘काश्मीर अवर’ या मोहिमेला पाठिंबा द्या. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मी यासाठी मजार-ए-काएदमध्ये उपस्थित असेल. काश्मिरी भावांच्या समर्थनासाठी माझ्यासोबत आपणही उपस्थित राहावे. मी ६ सप्टेंबरला शहिदांच्या घरी भेट देणार आहे आणि लवकरच सीमारेषेवर देखील जाणार आहे.

गंभीरने शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटनंतर त्याला अतिशय चोख उत्तर दिले आहे. गंभीर त्यात असे म्हणाला आहे की, मित्रांनो, शाहिद आफ्रिदी हा स्वत:ला विचारत आहे की, शाहिद आफ्रिदीला आणखी शरम आणण्यासाठी काय करु शकतो? कारण की, हे पूर्णपणे स्पष्ट होईल की, आफ्रिदीने परिपक्व न होण्याचे मनाशी ठरवले आहे. त्याच्यासाठी मी ऑनलाइन किंडरगार्टन ट्यूटोरियलची ऑर्डर देत आहे.


दरम्यान, याआधी २३ ऑगस्टला शाहिद आफ्रिदीने एक ट्विट केले होते. त्याने ज्यामध्ये जम्मू-काश्मीर व कलम ३७० बाबत भारत सरकारच्या निर्णयाबाबत काही सवाल उपस्थित केले होते. त्याने त्यात असेही म्हटले होते की, संयुक्त राष्ट्राने काश्मीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करावा.


गौतम गंभीरने आतापर्यंत अनेकदा ट्विटरवरुन शाहिद आफ्रिदीला चांगलेच झापलेले आहे. पण आफ्रिदी तरी देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन भारताबाबत टोकाची मते व्यक्त करत असतो. गंभीरशिवाय अनेकदा वीरेंद्र सेहवागने देखील आफ्रिदीला योग्य शब्दात झापले आहे. पण तरीही आफ्रिदी अद्यापही ताळ्यावर आलेला नसल्यामुळे यापुढे देखील गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळू शकते.

Leave a Comment