उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप; न्यायालयाच भ्रष्टाचाऱ्यांचे पाठीराखे


नवी दिल्ली – उच्च न्यायालयात न्या. राकेश कुमार यांच्यावर तत्काळ प्रभावाने दाखल खटल्यांच्या सुनावणीवर बंदी घालण्यात आली असून यासंदर्भात पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी न्या. राकेश कुमार यांना नोटीस पाठवत कोणत्याही याचिकेवर ते सुनावणी करणार नसल्याचे असे स्पष्ट केले आहे. कारण, आपल्या वरिष्ठांच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. न्या. राकेश कुमार यांनी म्हटले होते की, भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पाटणा उच्च न्यायालयाचे प्रशासनच पाठीराखे आहेत.

आपल्या सहकारी न्यायाधीशांवर मुख्य न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसारच काम करीत असल्याचा आरोप न्या. राकेश कुमार यांनी माजी आयपीएस अधिकारी रमैया प्रकरणाची सुनावणी करताना केला होता. तसेच, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाकडून जामीन नाकारल्यानंतरही रमैया यांना कनिष्ठ न्यायालयाकडून जामीन मिळण्यावर आक्षेप घेतला होता. वरिष्ठ न्यायालयांनी जामीन नाकारलेला असताना कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीनच कसा काय दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

न्या. राकेश कुमार बुधवारी सुनावणीदरम्यान म्हटले की, भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये जे अधिकारी दोषी आढळले आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी, पण तसे न होता त्यांना साधारण शिक्षा देऊन सोडून दिले जात आहे. न्या. राकेश कुमार यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर त्यांना सुनावणी करण्यापासून रोखण्यात आले.

न्या. राकेश कुमार यांनी म्हटले, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आयपीएस रमैया यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाकडून अशा वेळी त्यांनी जामीन मिळवला ज्यावेळी निरिक्षण विभागाचे नेहमीचे न्यायाधीश सुट्टीवर होते. जे न्यायाधीश त्यांच्या अनुपस्थितीत हा कार्यभार सांभाळत होते त्यांच्याकडून अशा प्रकारे जामीन कसा काय घेतला गेला.

Leave a Comment