युद्धसेवा मेडल विजेती अधिकारी सांगतेय युद्धाचा थरार


युद्धसेवा मेडल मिळविणारी हवाई दलातील पहिली महिला अधिकारी स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना येत्या ८ ऑक्टोबर रोजी हवाई दल दिनाच्या दिवशी हे मानाचे पदक बहाल केले जात आहे. त्यानिमित्ताने त्यांनी हवाई दलाच्या परवानगीनंतर मुलाखत देताना त्या क्षणाचा थरार सांगितला आणि याच क्षणासाठी हवाई दलात सेवा करताना देशासाठी सर्वश्रेष्ठ देण्याची इच्छा अचानक पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.

मिंटी सांगतात, २६ फेब्रुवारीला सीमापार जाऊन भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बालाकोटवर बॉम्ब टाकून दहशतवादी अड्डे नष्ट केले खरे पण त्याचबरोबर पाकिस्तान कडून उलट हल्ला होऊ शकेल या जाणीवेतून सर्वत्र हाय अलर्ट होता. मिंटी पाथ फाईंडर फायटर कंट्रोलर युनिट मध्ये होत्या. या युनिटवर मोठी जबाबदारी असते कारण त्यांना आपल्या हवाई सीमेची निगराणी करायची असते आणि हवेत युद्धाची वेळ आलीच तर रडारवरून शत्रू विमानांचे अचूक ठिकाण शोधून त्यानुसार रणनीती बनवावी लागते. त्यानुसार आपल्या लढावू विमानांना दिशा निर्देश द्यावे लागतात.

मिंटी २६-२७ तारखांना उत्तर कमांड मध्ये कार्यरत होत्या तेव्हा त्यांना २७ तारखेला सकाळीच शत्रूची सुमारे २५ विमाने श्रीनगरवर चालून येत असल्याचे रडारवर दिसले. त्यांनी त्वरित अलार्म दिला आणि श्रीनगर बेसवरून तीन भारतीय लढाऊ विमानांनी आकाशात शत्रूच्या विमानांचा रस्ता अडवून त्यांना बॉम्बफेक न करताच परत जाणे भाग पडले. पण त्याचवेळी अन्य शत्रू विमाने आपल्या हद्दीत शिरल्याचे दिसले आणि हवाई युद्धाला तोंड फुटले. मिंटी यांनी शत्रू विमानांची लोकेशन काही क्षणात निश्चित केली आणि त्यापुढचे पाउल म्हणजे आपल्या पायलटना शत्रूच्या विमानांच्या दिशेची अचूक माहिती दिली.

त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन त्याच्या मिग २१ बायसन मधून पाकिस्तानच्या दोन एफ १६ विमानांचा पाठलाग करत होते. योग्य जागा मिळताच मिंटी यांनी अभिनंदन यांना ‘ टार्गेट लॉक, हिट ‘ असा संदेश दिला आणि अभिनंदन यांनी डागलेल्या मिसाईल मुळे एक एफ १६ आगीच्या लोळात सापडले. अभिनंदन दुसऱ्या विमानाचा पाठलाग करू लागले तेव्हा ते सीमापार जात आहेत असे दिसताच त्यांना परत फिरा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा त्यांचे विमान जॅमर लावलेल्या परिसरात असल्याने हा संदेश त्यांना मिळाला नाही आणि त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला. अर्धा तास हे थरारक नाटय सुरु होते.

मिंटी सांगतात यात मी विशेष काही केले नाही. शत्रू विमाने दिसली तेव्हा आमचे मनोधैर्य कायम होते कारण असे क्षण येणार हे गृहीत धरूनच आम्ही या सेवेत आलो आहोत. मात्र माझ्यासाठी हा क्षण समाधान पूर्ती करणारा ठरला कारण देशासाठी मी काहीतरू करू शकले होते.

Leave a Comment