राक्षसभुवनचा विज्ञान गणेश


गणेशकोश, मुद्गल पुराण व भविष्य उत्तर पुराणात गणेशाची २१ महत्त्वाची पीठे सांगितली गेली आहे. विविध नावांनी ही पीठे प्रसिद्ध असुन त्यातील एक पीठ आहे जालन्यापासून ३३ किमी वर असलेल्या राक्षसभुवन येथे. राक्षसभुवन साडेतीन शनिपीठांपैकी एक मानले जातेच पण येथेच खुद्द दत्तात्रेयांनी स्थापन केलेला गणेश असून त्याला विज्ञान गणेश असे म्हटले जाते. इतिहासकारांच्या मते गोदावरी काठी असलेले हे मंदिर १७६३ ते ६४ सालातील असावे.

या मागे एक कथा सांगितली जाते. या ठिकाणी अत्री ऋषी व अनुसुया यांचा आश्रम होता. अनुसुया मोठी पतिव्रता होती व तिची कहाणी नारद मुनींनी ब्रह्मा विष्णु व महेशाच्या पत्नींना सांगितली. त्यावेळी आपल्या बलवान पतीची तुलना अत्री ऋषींबरोबर होतेय व आपणही इतक्या पतिव्रता असताना अनुसुयेला तो मान जातोय हे पाहून या तिघीही रागावल्या व आपल्या पतींना त्यांनी अनुसुयेचा पतिव्रता भंग करण्यास सांगितले. पत्नींच्या हट्टापुढे या देवांचे कांही चालले नाही व त्यांनी अनुसुयेच्या दारात याचक म्हणून जाऊन भिक्षा मागितली. अनुसुया भिक्षा घेऊन आली तेव्हा रूप बदलून आलेल्या या देवांनी तिला विवस्त्र होऊन भिक्षा वाढली तरच घेऊ असे सांगितले.

याचकाच्या या मागणीने अडचणीत आलेल्या अनुसुयेने आपल्या पतीला ही हकीकत सांगितली तेव्हा तपात असलेल्या अत्री ऋषींनी तीर्थ शिंपडून त्यांना विवस्त्र होऊन भिक्षा घाल असे सांगितले. अनुसुयेने तीर्थ शिंपडताच या याचकांचे लहान बाळांत रूपांतर झाले व अनुसुयेचे पातिव्रत्य अभंग राहिले. आपल्या पतींची बाळे झाल्याचे पाहून या देवांच्या पत्त्नी अनुसुयेकडे आल्या व तिची माफी मागून त्यांनी त्यांना मुळे रूपात येऊ दे अशी प्रार्थना केली मात्र अनुसुयेने या बाळांना दूर करण्यास नकार दिला अखेर या तीनही देवांचे अंश रूप तुला मिळेल असा आशीर्वाद मिळाल्यावर अनुसुया तयार झाली. त्यानंतर दुर्वात्रय, चंद्रात्रय व दत्तात्रय यांचा जन्म झला. त्या दत्तात्रेयांनी येथे विज्ञान गणेशाची स्थापना केली.

Leave a Comment