खासगी क्षेत्रातील आयसीआयसी बँक देशातील करन्सी चेस्टमध्ये नोटा मोजण्यासाठी औद्योगिक रोबो आर्म वापरणारी देशातील पहिली बँक ठरली आहे. या संदर्भात बँक ऑपरेशन आणि कस्टमर सर्विस प्रमुख अनुभूती संघाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हे रोबो मुंबई, सांगली, नवी दिल्ली, बंगलोर, मंगळूर, जयपूर, हैद्राबाद, चंदिगढ, भोपाळ, रायपुर, सिलीगुडी आणि वाराणसी येथे काम करत आहेत. ही औद्योगिक रोबोची १४ मशीन्स १२ शहरात बसविली गेली आहेत.
आयसीआयसीआय मध्ये नोटा मोजणार रोबो
संघाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हे रोबो कामाच्या दिवसात ६० लाख नोटा मोजू शकतात तर वर्षाला १.८० अब्ज नोटा मोजू शकतात. आयसीआयसीआय या रोबोंचा वापर करणारी देशातील पहिली तर बाकी जगातील काही निवडक बँकांमधील एक बनली आहे. हे रोबो आर्म ७० पेक्षा अधिक पॅरामीटरवर विविध सेन्सरच्या वापराने कोणताही ब्रेक न घेता सतत काम करू शकतात. रिझर्व्ह बँकेने स्वच्छ नोट पॉलिसी बंधनकारक केल्यानंतर बँका करन्सी चेस्टमध्ये उच्च दर्जाच्या नोटा मोजणाऱ्या मशीन्सचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे स्वच्छ नोटा त्यानंतर शाखा आणि एटीएम कडे पाठविणे शक्य झाले आहे.