पाकिस्तानमध्ये पोलिसांद्वारे चालवली जात आहे गुप्त ‘छळ छावणी’


पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांद्वारे गुप्त टॉर्चर सेल (छळ छावणी) चालवले जात आहे.  राज्य पोलिस प्रमुखांना आरोपींचा कोणत्याही प्रकारचा छळ करण्यात येऊ नये असे आदेश द्यावे लागले आहेत. यासंदर्भात डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आदेश देण्यात आल्यानंतर देखील अनेक ठिकाणी टॉर्चर सेल सुरू आहेत. लाहोरमधील गुर्जरपुरा स्टेशन हाउस ऑफिसर मोहम्मद रजा जाफरी आणि तीन कॉन्सटेबल यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या टॉर्चर सेलचा खुलासा झाला आहे.

एका अधिकाऱ्याने डॉन न्यूजशी बोलताना सांगितले की, या सेलचा खुलासा अँटी करप्शन विभागाने केला आहे. त्यांनी सांगितले की, तपास करत असताना त्यांना किंचाळण्याचे आवाज ऐकू आले. त्यांना जंगलामध्ये एक इमारत दिसली व त्यांनी त्या घटनेचे रेकॉर्डिंग केले.

त्या अधिकाऱ्यांना तेथे 6 लोक बंद रूममध्ये सापडले. थर्ड डिग्री टॉर्चर केल्याने त्यातील एक जण गंभीर जखमी होता. रेकॉर्डिंगमध्ये तो व्यक्ती सांगत आहे की, त्याच्या पाठीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. यामुळे त्याला जागेवरून हलता देखील येत नाही.

डॉन न्यूजनुसार, अन्य बंदींची देखील हीच गोष्ट आहे. एक व्यक्ती मेक-अप आणि दागिन्यांचे दुकान चालवायचा. पोलिसांनी देखील त्याला उचलून सेलमध्ये आणले आणि त्याचा छळ केला. तसेच काहींना त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपांची देखील माहिती नाही. अनेकांनी सांगितले की, पोलिस अनेकवेळा रात्रीचे छळ करण्यासाठी यायचे.

Leave a Comment