मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणार पहिली खासगी रेल्वे


भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठा बदल होणार आहे. रेल्वेने पहिली खाजगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली खाजगी रेल्वे तेजस एक्सप्रेस नोव्हेंबर महिन्यापासून अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर चालेल. केंद्र सरकारने आयआरसीटीसीला ही रेल्वे भाडेतत्वावर दिली आहे. रेल्वेमध्ये प्रवाशांच्या तपासणीसाठी स्टेशनवर चेकइन काउंटर बनवले जातील. रेल्वेला एक तासापेक्षा अधिक उशीर झाला तर प्रवाशांना पुर्ण रिफंड देण्यात येईल. रेल्वेचे भाडे निश्चित करण्यासाठी आयआरसीटीसी सध्या कार्य करीत आहे. या रेल्वेला लखनऊ-दिल्ली मार्गावर देखील चालवण्याची योजना तयार करण्यात येत आहे.

या रेल्वेचे वेळापत्रक देखील आयआरसीटीसीकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. या रेल्वेच्या तिकीटाचा दर हा याच मार्गावर चालणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस एवढा असण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये दोन टॉयलेट असतील. तसेच, फुड सर्विस मॅनेजमेंटची देखील योजना आखण्यात येत आहे. रेवेन्यू वाढवण्यासाठी रेल्वेच्या आत व बाहेर जाहीराती लावल्या जातील. तसेच रेल्वेमध्ये बूक करण्यात आलेले सामान घेऊन जाण्याची देखील शक्यता आहे.

ज्या प्रमाणे विमानात बसण्याआधी तिकीट तपासले जाते, त्याचप्रमाणे या रेल्वेत बसण्याआधी तिकीट तपासले जाईल. यासाठी आयआरसीटीसी तिकीट देईल. तसेच रेल्वेचा टीसी तिकीटाची तपासणी करणार नाही. तर आयआरसीटीसी स्वतःच्या अधिकृत स्टाफची नेमणूक करेल.

तसेच, रेल्वेच्या नियमांप्रमाणेच अपघात झाल्यास विमा प्रदान केला जाईल. ही ट्रेन चालवण्यासाठी आयआरसीटीसी रेल्वेला वर्षाचे भाडे देईल. तेजस एक्सप्रेसमध्ये सुरूवातीला केवळ 12 कोच असतील. पुढे जाऊन कोचची संख्या वाढवली जाईल.

रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, सकाळी 6.10 वाजता रेल्वे अहमदाबादवरून सुटेल, त्यानंतर दुपारी 1.10 ला मुंबई सेंट्रलला पोहचेल. त्यानंतर पुन्हा 3.40 वाजता अहमदाबादच्या दिशेने रवाना होईल व रात्री 9.55 वाजता पोहचेल.

या एक्सप्रेसमध्ये एलसीडी स्क्रीन, अटेंडेंट बटन, चार्जिंग आणि यूएसबी, फ्री चहा-कॉफीची वेंडिंग मशीन देखील असेल.

Leave a Comment