पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना भिक घालत नाही – लेफ्टनंट जनरल


नवी दिल्ली – मंगळवारी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजारी देशांना लष्कराच्या पूर्वोत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एमएम नरवाणे यांनी कठोर शब्दात संदेश दिला. चीनने नियंत्रण रेषेवर वादग्रस्त क्षेत्रात आतापर्यंत 100 वेळा प्रवेश केला आहे. पण 1962 च्या भारत चीन युद्धासारखे आताचे भारतीय लष्कर हे राहिलेले नाही, असे ते यावेळी म्हणाले. तसेच पाकिस्तानलाही त्यांनी यावेळी स्पष्ट शब्दात इशारा दिला. अण्विक हल्ल्याच्या पाकिस्तानने कितीही धमक्या दिल्या तरी भारत आता त्याला घाबरणार नसल्याचे नरवाणे यांनी म्हटले आहे.

लेफ्टनंट जनरल एमएम नरवाणे कोलकात्यातील भारत चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आपल्या सीमांची सुरक्षा’ या परिसंवादात बोलत होते. भारतीय लष्कर डोकलाममध्ये चीनच्या लष्करासमोर उभे ठाकले होते. त्यावरून भारतीय लष्कर हे दुबळे नाही असा संदेश चीनला मिळाला होता, असेही ते म्हणाले. माजी हवाईदल प्रमुख अरूप राहा हेदेखील या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. त्यांनी 1962 नंतर उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल सवाल केला. आता हे 1962 मधील लष्कर नाही. चीन जर आपल्याला सांगतो इतिहास विसरू नका, तर आपणही त्यांना असेच सांगितले पाहिजे. 1962 पासून भारत आता फार पुढे आला आहे. चीनने डोकलाममध्ये 2017 साली केलेल्या घुसखोरीदरम्यान, त्यांची कोणतीही तयारी दिसून आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे.

Leave a Comment