ज्या कंपनी होता कारकून त्याच कंपनीत झाला असोसिएट क्रिएटिव्ह डायरेक्टर


कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचे असेल तर ती गोष्ट करण्याची प्रथम इच्छा पाहिजे. इच्छाशक्तीला माणसाच्या जीवनात फार महत्त्व आहे. मनाच्या सामर्थ्यांचा इच्छाशक्ती हा एक भाग असून ती एक अमूर्त शक्ती असून माणसाच्या कार्यातूनच त्याची प्रचिती येते. इच्छाशक्ती म्हणजे कल्पनेतली इच्छा किंवा मानोरथ नव्हे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते, ती म्हणजे इच्छाशक्ती! याचा प्रत्यय मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीमुळे आला आहे. आपल्या डोळ्यात साठवलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानेही दिवसरात्र एक केली आणि ज्या कंपनीत एकेकाळी तो शिपायाचे काम करत होता त्याच कंपनीचा तो आज असोसिएट क्रिएटिव्ह डायरेक्टर बनला आहे.

एका व्यक्तीचा जीवनप्रवास फेसबुकवरील ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या पेजवरून उलगडण्यात आला आहे. आपला जीवनप्रवास त्याने स्वत: शब्दांमध्ये मांडला आहे. जी स्वप्न आपण पाहतो ती पूर्ण करू शकतो. एका लग्झरीप्रमाणे ते स्वप्न मी देखील पाहिले होते. परंतु माझ्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती उत्तम नसल्यामुळेच दहावीनंतर मी शिक्षण सोडले आणि एका जाहिरात कंपनीत शिपायाचे काम करू लागलो, असे त्याने नमूद केले आहे.

प्रत्येक ऑफिसप्रमाणे मी आवश्यक ती कामेही करत होतो. तेथील लोकांच्या चहापानाची व्यवस्था करत होतो. त्याचबरोबर ऑफिसमधील इतर कामे म्हणजेच धावत जाऊन प्रिंट्स आणणे, अशी सर्व कामे केली. मला खुप आनंद त्याठिकाणी तयार करणारी डिझाइन्स पाहून होत होता. मी अनेकदा ऑफिसमध्ये होणाऱ्या चर्चाही ऐकल्या देखील होत्या. माझ्याही डोक्यात काही कल्पना अनेकदा आल्या पण एका कारकूनाचे कोण ऐकेल, अशी परिस्थिती होती, असे तो आपल्या यशस्वी प्रवासाचे वर्णन करताना सांगितले.

पण मी पैशाला पैसा जोडत माझे शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळी आणखी तीन वर्ष कॉलेजला जाऊन पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय मी घेतला. आर्टच्या कोर्ससाठी त्यावेळी मी प्रवेश अर्ज केला. सकाळी कॉलेज, त्यानंतर ऑफिस आणि रात्री शिकवणी घेणे अशी माझी त्याकाळी दिनचर्या सुरू होती. मला झोप फार कमी वेळ मिळत होती. पण त्यामुळे मिळणारा आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा असल्याचाही तो सांगतो.

मी शिक्षणादरम्यानच एजन्सीमध्ये काही मित्रांसोबत जोडला गेलो. एका छोट्या जाहिरात एजन्सीमधून त्याचदरम्यान मला नोकरीची ऑफर आली आणि मला एक फोन आला आणि माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले. मी ज्या कंपनीत कारकून म्हणून काम केले होते त्याच कंपनीत मला कंटेट रायटर म्हणून नोकरी करण्यासाठी विचारणा झाली. आज माझी बढती झाली असून मी त्याच कंपनीत असोसिएट आर्ट डायरेक्टर म्हणून काम करत असल्याचेही तो आनंदाने सांगतो. माझे लग्नही याचदरम्यान झाले आणि मी माझ्या जीवनातील पहिली बाईक विकत घेतली. आम्ही दोघेही सध्या बरेच पैसे वाचवतो आणि अनेक ठिकाणी फिरायलाही जातो. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की अशी कोणतीही परिस्थिती या जगात नाही ज्या ठिकाणाहून परतून तुम्ही नवी सुरूवात करू शकत नाही. कोणतेही स्वप्न मोठे नसते केवळ स्वत:वर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचा मोलाचा सल्लाही त्याने दिला आहे.

Leave a Comment