फिरोजशाह कोटला स्टेडियम होणार अरुण जेटली स्टेडीयम


डीडीसीआयने नुकताच एक मोठी घोषणा केली असून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमला डीडीसीआयचे अध्यक्षपद दीर्घकाळ भूषविलेले माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कार्यकारणीच्या सभेत हा निर्णय एकमताने घेतला गेल्याचे डीडीसीआयचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी जाहीर केले. १२ सप्टेंबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडीयममध्ये हा सोहळा होणार असून याचवेळी या मैदानावरील एका स्टँड ला टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याचे नाव दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडा मंत्री किरण रीजीजू आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

अरुण जेटली यांचे २४ ऑगस्ट रोजी निधन झाले. वकिलीचा व्यवसाय करतानाचा त्यांनी राजकारण आणि क्रिकेटशी घट्ट नाते जोडले होते. अर्थ, संरक्षण असे महत्वाचे विभाग सांभाळतानाच त्यांनी डीडीसीआयचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले होते. बीसीसीआय मध्येही महत्वाचे पद त्यांनी भूषविले होते तसेच आयसीसी गव्हर्निंग कॉन्सिलचे ते सदस्य होते.

जेटली यांनी या स्टेडीयमवर आधुनिक सुविधा दिल्याच पण प्रेक्षक क्षमता वाढविणे, जागतिक दर्जाची ड्रेसिंग रूम बनविणे यालाही प्राधान्य दिले. जेटली अध्यक्ष असताना दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील अनेक गुणवान खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. त्यात गौतम गंभीर, वीरेंद्र शेह्वाग, विराट कोहली, इशांत शर्मा, शिखर धवन यांचा समावेश आहे.

रजत शर्मा म्हणाले, फिरोजशाह कोटला स्टेडियमला जेटली यांचे नाव दिले जात असले तरी मैदानाचे नाव बदलले जाणार नाही. ते फिरोजशाह कोटला मैदान असेच राहणार आहे.

Leave a Comment