जगजेत्त्या पीवी सिंधूने घेतली मोदींची भेट


भारतीय बॅडमिंटन इतिहासात प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या शटलर पीव्ही सिंधूचे दिल्लीत मंगळवारी आगमन झाल्यावर तिने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. विमानतळावर पत्रकाराशी बोलल्यानंतर सिंधूने पंतप्रधान मोदी आणि क्रीडामंत्री किरण रीजीजू यांची भेट घेतली. मोदीनी या भेटीचे फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर शेअर केले असून भारतासाठी ही गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी सिंधूचे अभिनंदन करताना एका चँपियनने सुवर्णपदक जिंकले आहे असे सांगून तिला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

क्रीडा मंत्री रीजीजू यांनीही ट्विट करून बॅडमिंटन चे जागतिक विजेतेपद मिळवून सिंधूने ऐतिहासिक कामगिरी केल्याचे व त्यासाठी तिचे अभिनंदन करत असल्याचे म्हटले आहे. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिंधूने तिच्यासाठी हा सुवर्णक्षण असल्याचे सांगून ती भारतीय आहे याचा तिला अभिमान वाटतो असे सांगितले. ती म्हणाली देशासाठी आणखी पदके जिंकायची आहेत. कसून मेहनत हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. तुमच्याकडून केले जात असलेले कौतुक, तुमचे प्रेम आणि समर्थन यामुळेच हे यश शक्य झाले. सर्व देशवासियांना धन्यवाद.

Leave a Comment