पुण्यातील वृक्षतोडीत 14 पटीने वाढ


पुणे – पुण्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 2018-19 मध्ये प्राधिकरणाकडून रितसर परवानगी घेऊन तोडण्यात आलेल्या झाडांच्या संख्येत 14 पटीने वाढ झाली आहे. पुणे महानगरपालिकेने 2017-18 मध्ये 251 झाडे तोडण्याची परवानगी दिली होती. तर 2018-19 मध्ये तब्बल 3697 झाडे तोडण्यात आली आहेत.

यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुरू असलेले प्रकल्प आणि खाजगी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात यासाठी परवानगी घेण्यात आली. मागील सात वर्षांमध्ये शहरातील 16,368 झाडे तोडण्यात आलेली आहेत. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही आकडेवारी सांगण्यात आली.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, जर झाडाला काही धोका असेल अथवा ते पडण्याच्या स्थितीत असेल तर ते तोडण्याची परवानगी देण्यात येते. तसेच प्रशासनाकडून झाडे तोडण्यासाठी काही अटी देखील घातल्या जातात. यामध्ये दुसऱ्या ठिकाणी झाडे लावण्यास सांगितली जातात.

महानगरपालिकेचे अधिकारी आदित्य मालवे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना आणि संबंधीत विभागाना झाडे लावण्याचे टार्गेट देण्यात आलेले आहेत. अनेक विकास कामामुळे झाडे तोडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.

प्रशासनाकडून एक झाड तोडण्याची परवानगी घेतल्यास, त्याबदल्यात तीन झाडे लावण्यास सांगितले जाते. मात्र पर्यावरणवाद्यांनुसार, हे केवळ कागदावरच दाखवण्यापुरते मर्यादित आहे.

Leave a Comment