कैद्याच्या पोटात वाजली मोबाईल रिंग


तिहार जेल मध्ये कैदेत ठेवण्यासाठी आणलेल्या एका कैद्याच्या पोटात मोबाईलची रिंग वाजल्याने जेलमध्ये एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार तिहारच्या जेल चार मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी एका चोरट्याला न्यायालयापुढे सादर केल्यावर तुरुंगात आणले. तेथे त्याची तपासणी सुरु असताना अचानक मोबाईलची रिंग वाजू लागली. पण आवाज कुठून येत आहे हे पोलिसांना समजेना. सुरक्षा रक्षक शोध घेऊ लागले तेव्हा हा आवाज कैद्याच्या पोटातून येत असल्याचे निष्पन्न झाले.

नंतर कैद्याला डॉक्टरकडे नेले गेले तेव्हा त्याने हाताच्या बोटाच्या आकाराचा मोबाईल फोन आणि चार्जरचे झाकण गिळले असल्याचे दिसून आले. डॉक्टरांच्या मदतीने मोबाईल बाहेर काढण्यात यश आले असले तर चार्जरचे झाकण अजून कैद्याच्या पोटातच आहे. चोरटा तसा निर्ढावलेला आहे. यापूर्वीही त्याला याच तुरुंगात आणले गेले होते तेव्हाही त्याने तुरुंगात मोबाईल आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नव्हता. आत्ता तो तुरुंगात फोन आणण्यात यशस्वी झाला तरी ऐनवेळी रिंग वाजल्याने त्याचा हा डाव फसला. असाच एक प्रकार काही दिवसापूर्वी मांडोली जेल मधेही घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment