राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची घरवापसी?


मुंबई : आणखी एका दिग्गज नेता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव शिवसेनेत घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भास्कर जाधव यांनी तासभर चर्चा केली होती.

उद्धव ठाकरेंसोबत गेल्या काही दिवसांमध्ये भास्कर जाधव यांची झालेली ही दुसरी बैठक होती. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव हे आमदार आहेत. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात नगरविकास, क्रीडा, वन अशी विविध मंत्रालय सांभाळली आहेत. रत्नागिरीच्या पालकमंत्रिपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती.

भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून 1982 मध्ये पक्षात आले. ते 1995 ते 2004 या काळात चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. त्यांनी दरम्यानच्या काळात अनेक लहान-मोठी पदही भूषवली. भास्कर जाधव यांनी 2004 मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला होता.

2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.

त्यांच्याकडे आघाडी सरकारमध्ये नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदही सोपवण्यात आले. भास्कर जाधव यांनी शिवसेनेची वाट धरल्यास राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल. बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे कालच पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत परतले. त्यावेळी ‘अजून कोण कोण येणार हे लवकरच कळेल’ अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यामुळे हे नेते कोण आहेत, याची उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment