सलमानच्या कॉन्सर्टमधून मिका सिंहची गच्छंती


मुंबई – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढलेला असतानाच भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पाकिस्तानी कलाकारांवर भारतातील सिने क्षेत्रातील संघटनांनी बंदी घातली आहे. या दरम्यान गायक मिका सिंह याला पाकिस्तानात गायन करणे भलतेच महागात पडले आहे.

मिका सिंहने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात गायन केले होते. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिकावर फिल्म वर्कर्स युनियनने बंदी घालण्याची घोषणा केली होती. मिकाने त्यानंतर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. असे असले तरी त्याला सलमान खानने मात्र माफ केलेले दिसत नाही.

अमेरिकेत सलमान खानचा लाईव्ह इव्हेन्ट होणार होता. मिका सिंगची वर्णी यातील गायकाच्या टीममध्ये लागली होती. २५ ऑगस्टपासून हा इव्हेन्ट सुरू होणार होता. पण हा इव्हेन्ट आता पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मिका सिंगला यामध्ये वगळण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे.

सलमानच्या किक चित्रपटात मिकाने “जुम्मे की रात है”, बजरंगी भाईजान चित्रपटात “आज की पार्टी मेरी तरफ से” आणि सुल्तान या चित्रपटातील “लग गए 440 वोल्ट छूने से तेरे” ही गाणी गायली आहेत. मिका हा सलमानचा जवळचा मित्र मानला जातो. मात्र मिकाच्या देशप्रेमाबद्दल प्रश्न चिन्ह उभे राहात असल्यामुळे त्याला वगळण्याचा कटू निर्णय सलमानला घ्यावा लागला आहे.

अशा प्रकारचा निर्णय सलमान खानने पहिल्यांदाच घेतलेला नाही. सलमान द कपिल शर्मा शोची निर्मितीही करतो. या शोमधील नवज्योत सिंह सिध्दू यांच्यावर पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणे आणि सैन्य अधिकाऱ्यांशी गळाभेट घेणे यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सिध्दू यांना द कपिल शर्मा शोमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a Comment