कर्मचाऱ्यांसाठी गुगलच्या नव्या गाईडलाईन्स


नेहमीच सोशल मीडियावर गुगलचे कार्यालय आणि त्यात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा हा चर्चेचा विषय असतो. त्यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या असतात, तर बऱ्याच अफवा असतात. यावर अनेकदा गुगलने खुलासेही केले आहेत.

नुकतीच एक नवी गाईडलाईन गुगलने कर्मचाऱ्यांसाठी दिली आहे. गुगलच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये करावयाच्या किंवा पाळायच्या गोष्टीही लिहिल्या आहेत. त्याचबरोबर ज्या गोष्टी करायच्या नाहीत, हे देखील लिहिले आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ऑफिसमध्ये राजकीय चर्चा किंवा वादविवाद कर्मचारी करू शकणार नाहीत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या गाईडलाईन्स गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून जाहीर केल्या आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याचे प्रथम कर्तव्य काय आहे? यापासून कामाच्या वेळेत टाईमपास करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या बाबींना या गाईडलाईन्समध्ये स्पर्श करण्यात आला आहे.

आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने म्हटले आहे की, ज्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते काम करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. येथे आम्हाला कामा व्यतिरिक्त इतर विषयांवर चर्चा करून वेळ दवडणे अपेक्षित नसल्यामुळे गुगलच्या कार्यालयात आता राजकीय विषयांवर चर्चा करणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीचे काम करणे हे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे गुगलने म्हटले आहे.

या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अनेक आव्हाने पार केल्यानंतर गुगलसोबत काम करण्याची संधी येते. जगभरातील कोट्यवधी लोक आपल्यावर चांगल्या क्वालिटीच्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी गुगलवर विश्वास ठेवतात. आपण, या लोकांच्या विश्वासाचा सन्मान केला पाहिजे आणि आपले प्रोडक्ट्स आणि सेवा देणे अखंड सुरू ठेवले पाहिजे. गुगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी सांभाळण्याच्या सूचना केल्या आहेत. गुगलने ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, तुम्ही जे काही व्यक्त करता त्याला एक अर्थ असतो. तुमच्या शब्दांमध्ये एक जबाबदारी असते आणि तुम्ही त्याला उत्तरदायी असता. त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रोलिंगपासून सावध राहण्याच्या सूचना गुगलने केल्या आहेत. कोणालाही ट्रोल करू नका. कोणाचेही नाव घेऊ नका आणि एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करण्यात येत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती किंवा मजकूराचा भाग होऊ नका.

त्याचबरोबर गुगल कंपनीशी निगडीत कोणत्याही अफवेला किंवा भ्रामक माहितीला पुष्टी देण्यास मनाई केली आहे. चांगली माहितीच कंपनी संदर्भात दिली पाहिजे. सगळे काही तुम्हाला माहिती आहे, असे समजू नका. गुगलच्या सेवा आणि प्रोडक्ट्स विषयी किंवा बिजनेसविषयी भ्रामक माहिती देऊ नका. गुगलवर काही दिवसांपूर्वी एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने पक्षपातीपणाचा आरोप केला होता. त्याची गुगलने गंभीर दखल घेतली आणि त्यानंतर तातडीने कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत.

Leave a Comment