वेस्ट इंडिजच्या महान फलंदाजाने घेतला बुमराहचा धसका


नवी दिल्ली – जगातील उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा समावेश होतो. अनेक फलंदाज त्याच्याकडील यॉर्करच्या अस्त्रामुळे त्याला घाबरुनच असतात. पण, या बुमराहचा धसका क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या फलंदाजांनीही घेतलेला दिसतो. जसप्रीत बुमराहची वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विव रिचर्ड्स यांनाही भिती वाटते.

बुमराहपेक्षा मला डेनिस लिलीला सामोरे जायला आवडेल’, असे रिचर्ड्स यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. बुमराहचे कौतुक करताना रिचर्ड्स म्हणाले, इतर गोलंदाजांपेक्षा बुमराह हा वेगळा आहे. तो जोपर्यंत तंदुरुस्त आहे तो तोपर्यंत फलंदाजांना आपल्या तालावर नाचवू शकतो.

नुकतेच कसोटीतील बळींचे सर्वात जलद अर्धशतक बुमराहने पूर्ण केले आहे. बुमराह सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ११ व्या सामन्यातच त्याने ही कामगिरी करुन दाखवली. बुमराहनंतर वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी १३ सामन्यात ही कामगिरी केली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचीही रिचर्ड्स यांनी स्तुती केली. मी त्याचा खुप सन्मान करतो. आम्ही दोघेही नेतृत्व, दृष्टिकोन, उत्साह या गुणांच्या बाबतीत एक आहोत. त्याचा आक्रमकपणा मला आवडतो.

Leave a Comment